E-varta

महाराष्ट्र पाऊस : मुसळधार पावसामुळे अनेक जिल्ह्यांत पूरस्थिती”

 

मागील चार दिवसांपासून सतत पडणाऱ्या मुसळधार पावसाने महाराष्ट्रातील अनेक भागांना अक्षरशः झोडपून काढलंय. सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड या जिल्ह्यांत हवामान विभागामार्फत ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. तसेच स्थानिक प्रशासनाकडून नागरिकांना सतर्कतेचा इशाराही देण्यात आला आहे. 

 

 

शाळांना सुट्टी जाहीर 

मुसळधार पडणाऱ्या पावसाने राज्यातील अनेक भागात पूरस्थिती निर्माण झालेली असून हवामान विभागामार्फत अजूनही काही भागात ऑरेंज अलर्ट जारी आहे. त्यामुळे 19 ऑगस्ट रोजी राज्यातील सर्व शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली होती. परंतु पावसाचा जोर पाहता पुढील 24 तासात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे आणि याच पार्श्वभूमीवर सिंधुदुर्गात जिल्हाधिकारी यांच्यामार्फत जिल्ह्यातील सर्व शाळांना दिनांक 20 ऑगस्ट 2025 रोजी सुट्टी जाहीर करण्यात आलेली आहे. 

 

 

 

रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाचा जोर वाढला 

दोन दिवस पडणाऱ्या पावसामुळे सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड जिल्ह्यातील सर्व नद्यांना पूर आला असून रस्ते आणि वाहतूक सेवा पूर्णपणे विस्कळीत झाली आहे. काही ठिकाणी रस्त्यावर पाणी आल्याने स्थानिक प्रशासनाकडून नागरिकांना सावधगिरीचा इशारा देण्यात आला आहे. नदीकाठच्या गावांनाही सावधगिरी बाळगण्याचे आदेश दिले गेले आहेत. पुढील काही दिवसांत कोकणात मुसळधार पाउस पडण्याची शक्यता आहे असेही हवामान विभागाने सांगितले.

 

 

राज्यातील शेतीच मोठे नुकसान 

सोमवारपासून सुरू असणाऱ्या पावसाने राज्यातील शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. नदीपात्राचे पाणी शेतजमिनीत घुसल्याने पिकांचे अतोनात नुकसान झाले असून शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे 

 

 

राज्यातील जलसाठ्यांची पाणी पातळी वाढली 

गेल्या पाच दिवसात सतत पडणाऱ्या पावसाने राज्यातील नद्या, तलाव, धरणे, प्रकल्प इ जलसाठ्यांमधील पाणी पातळी वाढली आहे. तुलसी, विहार, तानसा, मोडकसागर, भातसा, वैतरणा या राज्यातील धरणांचा पाणीसाठा वाढला.

 

 

गणपतीसाठी कोकणात येणाऱ्या चाकरमान्यांचे हाल 

विदर्भ, मराठवाडा, मुंबई आणि यासोबतच कोकणात मुसळधार पडलेल्या पावसामुळे रेल्वेवाहतूक सुद्धा रखडली आहे. कोकणात येणाऱ्या अनेक गाड्या पावसामुळे रद्द करण्यात आल्या असून काही गाड्या उशीरा सोडण्यात येत आहेत. त्यामुळे कोकणात येणाऱ्या चाकरमान्यांचा खोळंबा झाला आहे. गणेश चतुर्थी म्हणजे कोकणातील सर्वांत महत्वाचा आणि मोठा सण. त्यातही मुंबईत राहणाऱ्या कोकणवासीयांचा हा वर्षातील सर्वात महत्वाचा,लाडका उत्सव. अशातच पावसाने जोरदार हजेरी लावल्याने ऐन चतुर्थीच्या तोंडावरच पूरस्थिती आणि गाड्यांचे हाल या परिस्थितीला सामोरे जावे लागत आहे.

 

 

पावसाचा जोर ओसरला

सिंधुदुर्ग जिल्ह्यात मात्र आज पावसाचा जोर कमी झाला असून पूरस्थिती हळूहळू आटोक्यात येत आहे. रस्त्यावर साचलेले पुराचे पाणी आता कमी झाले असून वाहतूक व्यवस्था पूर्ववत होताना दिसत आहे. मात्र असे असले तरी ढगाळ वातावरण आणि पावसाची चिन्हे कायम आहेत. त्यामुळे पावसाचा जोर ओसरला तरी नागरिकांनी घराबाहेर पडताना स्वतःची काळजी घ्यावी असे आवाहन स्थानिक आणि राज्य प्रशासनाकडून करण्यात येत आहे.

 

Exit mobile version